अष्टवक्र रिव्ह्यू (Marathi Review)

0
503

अष्टवक्र रिव्ह्यू

एका दुर्लक्षित आणि नाजूक विषयाचा प्रयत्न :-
भारतातील तुरुंगातील स्त्री कैद्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यातच ती स्त्री गरोदर असेल तर तिच्या समस्यांना पारावार नसतो. बाळंतपणात अडचणी आणि त्यानंतर मुलांना जन्म दिल्यानंतर ती मुलांसोबत वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत राहू शकतात पण त्यानंतर त्या मुलांची रवानगी एखाद्या अनाथाश्रमात होते आणि आईमुलांची ताटातूट होते आणि इथेच खऱ्या अर्थाने त्या मुलांच्या आयुष्याची परवड चालू होते. संस्कारशून्य बालपण, बौद्धिकदृष्ट्या अविकसित, गुन्हेगारी लोकांची सतत ओळख या सर्वांचा परिणाम त्यांच्या भविष्यावर होतो आणि ते अंधकारमय होते. तुरुंगाबाहेरील समाजाला मात्र याची काडीमात्र कल्पना नाहीए, असा हा एक गंभीर, नाजूक आणि दुर्लक्षित प्रश्न आणि अष्टवक्र हा मराठी सिनेमा याच विषयाला हात घालणार आहे. एक कथानक श्रीमंत पण एक चित्रपट म्हणून खूप कमी पडणारा असा हा अष्टावक्र सिनेमा.

संक्षिप्त कथानक असे की, अरुंधती (मयुरी मंडलिक) ही एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची (विद्याधर जोशी) एक हुशार स्वावलंबी मुलगी तिच्यासोबतच शिकणार्‍या एका मुलाच्या म्हणजेच अजयच्या (मंगेश गिरी) प्रेमात पडते आणि नंतर लग्न सुद्धा करते. लग्नानंतरच्या कुजबुजीत एके दिवशी अजयचा अपघाती मृत्यू होतो आणि अरुंधतीला त्याच्या खुनासाठी सात वर्षांची जेल होते. तुरुंगातील नवीन विश्व पाहून अरुंधती थक्क होते आणि गरोदर असल्यामुळे आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलाच्या भविष्याचा विचार करून गर्भपाताचा निर्णय घेते. अर्थात प्रशासन त्याला परवानगी नाकारते मग अरुंधती उच्च न्यायालयात आपला लढा लढते आणि आपली बाजू खंबीरपणे मांडते. एवढ्या चांगल्या आणि महत्त्वाच्या विषयावर चित्रपट बनवताना अष्टवक्र मध्ये आवश्यक गोष्टींचा अभाव जाणवतो. मूळ विषयाला पटकथेत खूप कमी जागा आहे आणि कथेची मांडणी खूप साधारण आहे. अभिनय ठीकठाक, छायाचित्रण आणि संकलन बरे, गीते आणि संगीताची खरंच काही गरज नसतानाही त्यांचा उपयोग केला गेला आहे. दिग्दर्शन काहीसे गडबडलेले वाटते कारण मूळ विषय सोडून बाकी गोष्टींची मांडणी करण्यातच जवळपास संपूर्ण चित्रपट संपून जातो.

एकूणतः अष्टवक्र सारखा नाजूक विषय अजून चांगल्यारित्या हाताळला गेला पाहिजे होता जेणेकरून एक महत्त्वाचा सामाजिक सिनेमा म्हणून लक्षात राहिला असता. असो, वरूणराज फिल्म्सने केलेल्या या प्रयत्नांसाठी थोडीफार तारीख त्यांच्या वाट्याला यावी, हीच शुभेच्छा!

Rating- २/*
(- समीर अहिरे)