Farzand Review (Marathi)

0
1143

फर्जंदएक देखणीय शूरगाथा :

आपल्या मराठ्यांच्या इतिहासातच एवढ्या छान छान कथा आहेत की मराठी सिनेसृष्टीला हा रिमेक वगैरेसारख्या फंदात पडायची गरज नाही. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज यासारखा मोठा विषय पण कुठला नसावा, फर्जंद ही त्याच कथांमधली एक शूरगाथा. स्वराज्यासाठी अत्यंत गरजेच्या अश्या पन्हाळा किल्ल्याच्या लढाईची आणि कोंडाजीच्या साहसाची शूरगाथा.

कथेबद्दल काही जास्त सांगण्याची गरज नाही आपणा सर्वास ऐतिहासिक घटनांची खूपशी किंवा थोडक्यात माहिती असतेच.  पण तरीही या घटना पडद्यावर पाहणे एक पर्वणीच असते आणि फर्जंद ती पर्वणी आहे. काहीच्या तांत्रिक चुका आणि असाधारण दिग्दर्शनाची कमतरता नसती तर फर्जंद एक ऐतिहासिक विस्मरणीय सिनेमा झाला असता. चित्रपटाची सर्वात भक्कम बाजू म्हणजे कलाकारांनी साकारलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा. प्रत्येक कलाकार त्याला दिलेल्या व्यक्तिरेखेत पूर्णता सामावून गेला आहे. चिन्मय मांडलेकर शिवाजीच दिसतो, मृणाल कुलकर्णी जिजाऊच वाटतात आणि बाकी सर्व कलाकार सुद्धा ज्या त्या व्यक्तिरेखेत शोभून दिसतात. अंकित मोहन,गणेश यादव, प्रसाद ओक, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, प्रवीण तरडे, आस्ताद काळे सर्वच्या सर्व कलाकार अक्षरशः ती व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करतात.

नितीन देसाई यांचे भव्य सेट डोळ्यांना सुखद आनंद देतात. गड,किल्ले, जंगल यांचे छायाचित्रणही चांगले टिपले आहे. अमितराज यांचे संगीत ठीकठाक आहेत. एक ऐतिहासिक सिनेमा करताना रंगभूषा, वेशभूषा आणि नृत्यदिग्दर्शन या गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते आणि ती येथे बऱ्या प्रमाणात घेतली गेली आहे. संवाद अंगावर रोमांच उठवणारे आहेत. दिग्दर्शन बरे पण अजून छान होऊ शकले असते. यासारखा भव्यदिव्य आणि अभिमानकारक सिनेमा परत परत बनणार नाही याचा दिग्दर्शकाने विचार करायला हवा होता आणि कदाचित आपल्याला मराठी सिनेमातला बाहुबली मिळाला असता. अर्थात शिवाजी महाराजांवर सिनेमा करणे म्हणजे एक शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे तरी या विशाल दबावाखाली केलेल्या प्रयत्नांसाठी फर्जंदच्या टीमचे कौतुक करायलाच हवे.

असो, एकूणतः फर्जंद एक पाहण्याजोगा सिनेमा आहे. सर्व अभिमानी मराठ्यांनी नक्की पहावा आणि आपल्या नवीन पिढीलाही दाखवावा जेणेकरुन त्यांना आपल्या अनन्यसाधारण इतिहासाची जाणीव होईल.

./*
(- समीर अहिरे)