‘मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींबरोबर आज दिव्यज फाउंडेशन तर्फे आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला.

0
197

भारताच्या पुढाकाराने जगभरात सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने अमृता फडणवीस यांनी स्थापन केलेल्या ‘दिव्यज फौंडेशन’च्या माध्यमाने दिनांक २१ जून २०१७ रोजी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या सुदृढ आरोग्यासाठी योगा सेशन्स आयोजित करण्यात आले होते. भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे येथे शिक्षण घेत असलेली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ४०० मुलं-मुली व मेळघाट-ठाणे परिसरातील २०० आदिवासी विद्यार्थी अशा एकूण ६०० विद्यार्थ्यांना अमृता फडणवीस यांनी मुंबई दर्शन व योगा दिवस साजरा करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस व अमृताजी फडणवीस यांनी आज दिनांक २१ जून २०१७ रोजी  सकाळी ८ वाजता नॅशनल स्पोर्ट्स क्लब वरळी, मुंबई येथे विद्यार्थांबरोबर आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला. यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला असून त्यांच्या हस्ते इयत्ता दहावीमध्ये ८० % पेक्षा अधिक गुण मिळविलेले ३ विद्यार्थी व मागील वर्षभरात खेळामध्ये राष्ट्रीय पातळीवर विशेष प्राविण्य मिळविलेल्या ६ विद्यार्थ्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर “आरोग्य सांभाळायचे असेल, तर रोज योगा करण्याशिवाय पर्याय नाही. तन आणि मन दोघांनाही आराम प्राणायमनेच मिळतो. तुम्ही समृद्ध भारताची पुढची पिढी आहात तुम्हाला स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आज योगा दिनाच्या निमित्ताने सर्वांनी मनाशी ठरवा की आज पासून रोज कमीत कमी १५ मिनिटं तरी स्वतःसाठी काढून योगासने आणि प्राणायम कराल.” असे सर्व विद्यार्थ्यांना आव्हाहन देखील केले.

हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिजात व्यक्तिमत्त्व जॅकी श्रॉफ, मराठी चित्रपट सृष्टीतील लव्हर बॉय स्वप्नील जोशी, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक श्री. शांतीलाल मुथ्था या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी देखील सर्व मुलांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी. तर ताणग्रस्त वातावरणातही शांत राहून समोरील परिस्थिती कशी हाताळावी यासाठी त्यांना धडे दिले.

स्वनिल जोशीने आपल्या अनोख्या अंदाजात गाणं गाऊन, डान्स करून सर्व मुलांचे मनोरंजनाद्वारे स्वागत करून स्वतःच्या आरोग्यासाठी, मनः शांतीसाठी कशी काळजी घ्यावी हे शिकविले. तर मुंबईचा भिडू जॅकी श्रॉफ आज सर्व मुलांसाठी मार्गदर्शक ठरले. “श्वास घ्यावा तर कासवासरारखा अगदी हळू-हळू. योगा करत रहा श्वास घेत राहा. हा अमूल्य सल्ला देत जॅकी श्रॉफनी सर्व मुलांमध्ये बसून हसत खेळत त्यांना योगाचे, प्राणायमचे महत्त्व समजावले.