कशी आहे सौंदर्या इनामदार?

0
555
  1. हर्षदाताई स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहात त्याविषयी काय सांगाल?
  • खर सांगायचं तर खूप आनंद होतोय. पुढचं पाऊल मालिका आणि त्यातील अक्कासाहेब या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मला नवी ओळख मिळाली. माझं अवघं विश्व बदलणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळतेय याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाहीय. माहेरी आल्याची भावना आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या निमित्ताने नव्याने आयुष्य सुरु होतं आहे असं म्हणता येईल.

2. तुमच्या मालिकेतल्या पेहरावाविषयी नेहमी उत्सुकता असते. ‘रंग माझा वेगळा’मध्ये काय वेगळेपण असेल?

  • पुढचं पाऊल मालिकेचा पेहराव मी स्वत: डिझाईन केला होता. यावेळेस मात्र पूर्ण श्रेय जातं स्टार प्रवाह वाहिनी, मालिकेची संपूर्ण टीम आणि अर्थातच आमची कॉश्च्युम डिझायनर शाल्मली टोळ्ये यांना. सौंदर्या इनामदार ही एक बिझनेस वुमन आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेला शोभेल असा पेहराव डिझाईन करण्यात आलाय. अतिशय मॉडर्न पण परंपरेला धरुन असा मिलाफ साधण्याचा प्रयत्न सौंदर्याच्या लूकसाठी करण्यात आलाय. आता पर्यंत अक्कासाहेबांच्या भूमिकेमधून प्रेक्षकांनी मला पारंपरिक रुपात पाहिलंय. आता रंग माझा वेगळा मालिकेतला माझा नवा अंदाजही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

3. तुमच्या व्यक्तिरेखविषयी काय सांगाल?

  • सौंदर्या इनामदार नावाची व्यक्तिरेखा मी साकारतेय. अतिशय हुशार आणि करारी अशी ती बिझनेस वुमन आहे. नावातच सौंदर्य आहे. त्यामुळे सौंदर्यावर प्रेम करणारी अशी व्यक्तिरेखा आहे. तुम्ही सुंदर असाल तर तुम्ही जगावर राज्य करु शकता असं तिचं ठाम मत आहे. तिच्या आयुष्यात काळ्या रंगाला अजिबात स्थान नाही. काळ्या रंगाचा तिटकारा असणाऱ्या सौंदर्याच्या आयुष्यात जेव्हा तिचा लाडका मुलगा सुनेच्या रुपाने काळा रंग घेऊन येतो तेव्हा तिच्या आयुष्यात नेमकी काय उलथापालथ होते याची गोष्ट ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून उलगडेल. आजवरच्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आणि आव्हानात्मक अशी ही भूमिका आहे.

4. या मालिकेतून नेमकं काय सांगायचं आहे?

  • कितीही नाकारलं तरी समाजात वर्णभेद हा आहेच. आपण कितीही प्रगती केली तरी हा फरक प्रत्येक स्तरात पाहायला मिळतो. परंतु शरीराचा रंग तुमची चमक दाखवू शकत नाही तर तुमच्या गुणांमुळे ती चमक दिसते हा संदेश मालिकेतून देण्याचा प्रयत्न आहे. या मालिकेतली नायिका अर्थातच दिपा तिच्या प्रेमात पडायला लावणाऱ्या गुणांमुळेच सर्वांचं मन जिंकते. काळ्या रंगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला ही मालिका तुम्हाला भाग पडेल. त्यासाठी नक्की पाहा रंग माझा वेगळा ३० ऑक्टोबरपासून रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.