गरबा प्रेमींसाठी सावनी रविंद्रचे नवरात्री स्पेशल गुजराती गाणे रिलीज

0
324

विविध भारतीय भाषांमध्ये गाणी गायलेली गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्र आता नवरात्री निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी गुजराती रास-गरबा गाण्याची एक सुरेल भेट घेऊन आली आहे. मराठीशिवाय हिंदी, तमिळ, तेलगु ह्या भाषांमध्ये गाणी गायल्यावर आता सावनीने पहिल्यांदाच गुजरातीत गाणे गायले आहे. राधा-कृष्णाच्या अलौकिक प्रेमाला समर्पित ‘कानुडा’ हे भक्तीपर रास-गरबा गाणे रिलीज झाले आहे.

‘सावनी ओरीजीनल्स’ या तिच्या म्युजीकल सिरीजमधील हे तिसरे गाणे आहे. सावनी सांगते, “आमच्या घरी घट बसतात. आई नऊ दिवस उपवास करते. प्रत्येक दिवसाचा वेगळा नैवेद्य असतो. ह्या नऊ दिवसांतून एक वेगळीच उर्जा वर्षभरासाठी आपल्याला मिळते. त्यामुळे मला नवरात्रोत्सव खूप आवडतो. मी वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली. पण गुजराती गाणे गाण्याची इच्छा अपूर्ण होती. रास-गरब्याच्या ह्या गाण्याने ती पूर्ण झाली.”

सावनी ह्या गाण्यात रास-गरबा करतानाही दिसत आहे. पहिल्यांदाच आपल्या म्युझिक व्हिडीयोमध्ये तिने डान्स-मुव्ज केल्या आहेत. ह्याविषयी विचारल्यावर सावनी म्हणते, “गायक असल्याने लहानपणापासून नवरात्रीमध्ये नेहमी गाणी गायली आहेत. गरबा केला नव्हता. आता ती इच्छा ही ह्या नव्या सिंगलव्दारे पूर्ण झाली.

” सावनी सांगते, “मी सोडून ह्या म्युझिक व्हिडीयोवर काम करणारी संपूर्ण टिम गुजरातीच आहे. ह्या गाण्याचे संगीतकार पार्थिव शाह आणि गीतकार प्रणव पांचाल आहेत. सह-गायक कौशल पिठाडिया हा अहमदाबादचा आहे. कौशलकडून मी गुजराती भाषेचा लहेजा शिकले. या गाण्याचे वैशिष्ठ्य म्हणजे दोन वेगवेगळ्या व्हॉइस टेक्सचर्समध्ये गाणे गायले आहे. गुजराती फोक गातानाचा ब्रॉड व्हाइस आणि माझा ओरिजनल आवाज अशा दोन वेगळ्या पध्दतीने एकाच गाण्यात गायलेय. पहिल्यादाच लाइव इन्ट्रुमेंट्ससह मी गायले आहे.”