नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर ‘मीडियम स्पाइसी’ मध्ये दिसणार

0
435

शहरी नातेसंबंधांभोवती गुंफण्यात आलेल्या ‘मीडियम स्पाइसी’ या रोमांचक चित्रपटाच्या निमित्ताने अनेक प्रतिभावंत कलाकार एकत्र आले आहेत. ललित प्रभाकर, सई ताम्हणकर आणि पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिकांसह सागर देशमुख, जेष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या सहाय्यक भूमिका असलेला हा चित्रपट या वर्षीचा कलाकारांची मांदियाळी असणारा चित्रपट ठरणार आहे. दरम्यान, आता या चित्रपटात नेहा जोशी आणि पुष्कराज चिरपुटकर दिसणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपटाचा प्रवास नावाप्रमाणेच लज्जतदार असून प्रदर्शनापूर्वी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे.

नेहा जोशी हिची ओळख मराठी चित्रपटसृष्टीतील एक उत्तम अभिनेत्री आहे. ‘फर्जंद’, ‘झेंडा’, ‘पोस्टर बॉईज’ आणि ‘नशीबवान’ यांसारख्या चित्रपटांमधून नेहाने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून, मागील वर्षी तिला ‘नशीबवान’ साठी राज्य पुरस्कारामध्ये उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच अभिनेता पुष्कराज चिरपुटकरला ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील आशूच्या भूमिकेसाठी रसिकांचे प्रेम मिळाले, याच भूमिकेसाठी त्याला २०१५ साली झी मराठी अवार्ड मिळाला आहे. गत काही वर्षात अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये त्याने वैविध्यपूर्ण भूमिका केल्या असून त्यातील ‘मंत्र’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला राज्य पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.