संगीताचा एक अविस्मरणीय अनुभव ‘छंद प्रितीचा’

0
1018

सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला सुबोध भावे, सुवर्णा काळे आणि हर्ष कुलकर्णी अभिनित ‘छंद प्रितीचा’ या आगामी मराठी चित्रपटाचे म्युझिक मुंबईत नुकत्याच झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. या प्रसंगी ‘छंद प्रितीचा’ चित्रपटाचे निर्माते चंद्रकांत जाधव, लेखक-दिग्दर्शक एन. रेळेकर, अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री नृत्यांगना सुवर्णा काळे, अभिनेते हर्ष कुलकर्णी, विकास समुद्रे, संगीतकार प्रविण कुंवर उपस्थित होते.

या सोहळ्याची सुरुवात विकास समुद्रे आणि जयवंत भालेकर यांच्या दमदार स्कीटने होत चित्रपटाचं पहिलं-वहिलं असं “आलं आभाळ भरून” हे रोमँटीक गाणं लाँच करण्यात आलं. तितक्यात ‘टांग टांग टांग धित तांग धित तांग… चा आवाज कानावर पडला आणि सजग होऊन सगळ्यांचे कान टवकारले जाऊन “निस्ती दारावर टिचकी मारा…” या ठसकेबाज लावणीचा आस्वाद घेतला गेला. बेला शेंडे आणि वैशाली सामंत या दोन्ही नामवंत गायिकांच्या सुरेल स्वरातील  फटकेबाज सवाल-जवाबांनी मैफिलीला रंगत आली. त्यानंतर सुवर्णा काळेच्या मोहक अदांनी रंगलेल्या “नाही जायचं घरी, वाजो पहाटेचे पाच…” या ठसकेबाज लावणीने मनमुराद डोलायला लावले.

प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ चित्रपटात एकूण आठ गाण्यांचा समावेश असून गीतकार एन. रेळेकर यांच्या लेखणीतून ती अवतरलेली आहेत. आजचा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक जावेद अली तसेच बेला शेंडे, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, केतकी माटेगावकर यांसारख्या एकापेक्षा एक मातब्बर अशा सरस गायक-गायिकांच्या मधुर स्वरांनी नटलेल्या या चित्रपटातील गीतांना संगीतकार प्रविण कुंवर यांनी संगीतबद्ध केलेले आहे.

प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ चित्रपटाची निर्मिती निर्माते चंद्रकांत जाधव यांनी केलेली असून चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केलेले आहे.

दिलखेचक लावण्या, ठेका धरायला लावणारं संगीत आणि कान तृप्त करणारे गायक – गायिकांचे कर्णमधूर आवाज त्यात कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय तर सोंगाड्या सुंदरचे खळखळून हसवणारे मार्मिक विनोद यांनी नटलेली कलाकृती ‘छंद प्रितीचा’ येत्या 10 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.