Mahesh Tilekar meets Ranu Mondal

0
199

Grateभेट! राणू मोंडाल#ranu mondal
रेल्वे स्टेशनवर गाणी गाऊन मिळेल त्या पैशात गरिबीत आयुष्य जगणारी राणू मोंडाल. जिचा”एक प्यार का नगमा है ” हे गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तिला भरभरून लोकांचे प्रेम मिळाले, कौतुकाचा वर्षाव झाला.

दारिद्र्यात जगणाऱ्या एका गायिकेला असं अचानक ’छप्पर फाडके’ यश देणाऱ्या परमेश्वराचे मला मनापासून आभार मानावे वाटतात. कधी योग आला तर राणू ला भेटून तिचं अभिनंदन करायचं असं मी मनाशी ठरवलं होतं.

काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर फ्लाईटची वाट पहात बसलो असताना समोरून राणू मोंडाल येताना दिसली बरोबर दोन व्यक्ती होत्या.ती येऊन अगदी माझ्या शेजारच्याच रिकाम्या सीटवर बसली. तिला पाहून मी स्मितहास्य केले आणि माझा परिचय दिल्यावर दोन्ही हात जोडून ती आदराने’नमस्ते’ म्हणाली. मी मला थोडीफार येत असलेल्या तिच्या बंगाली भाषेत बोलायला सुरुवात करत तिचं अभिनंदन केलं तेंव्हा तिचा चेहरा खुलला.मग आमच्यात फ्लाईट येई पर्यंत गप्पा सुरू राहिल्या. राजघराण्यातील स्त्रिया घालतात तश्या तिच्या हातातील सोन्याच्या जाड बांगड्या लक्ष वेधून घेत होत्या. तिच्या बरोबर असणाऱ्या दोन व्यक्ती म्हणजे एक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ज्याने राणूचा स्टेशनवर गातानाचा व्हिडिओ काढून व्हायरल केला आणि दुसरी व्यक्ती तिचा असिस्टंट.त्यांच्याशी पण तिने माझी ओळख करून दिली.अचानक मिळालेल्या यशामुळे तिला होत असलेला आनंद ती बोलून दाखवत होती आणि न विसरता देवाचे,तिचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाचे आणि हिमेश रेशमियाचे ती कृतज्ञतेने आभार मानत होती .फ्लाईट आल्यावर निघताना तिच्याबरोबर मी फोटो काढू शकतो का? असं मी विचारल्यावर “आप मेरे साथ फुटो निकालेगे” असं आश्चर्यानं विचारत ती थोडीशी लाजली आणि पुन्हा म्हणाली ”आप मेरसे बढे है”. त्यावर मी मस्करी करत तिला विचारलं की माझ्या सध्याच्या केसांच्या लुक वर जाऊन माझं वय जास्त वाटून तर ती मला बढे है म्हणत नाहीना?त्यावर ती पुन्हा निष्पाप मुलासारखी हसली आणि म्हणाली ”आप प्रोडूसर डायरेक्टर है इस्लिये मुजसे बडे है”.यशाची हवा तिच्या डोक्यात गेली नाही ते पाहून मलाही कौतुक वाटलं. झगमगत्या फिल्मी दुनियेत ती अजून नवीन असल्याने तिचं नवखेपण जाणवत होतं. जाताना मात्र पुन्हा हात जोडून तिनं नमस्कार केला.
ती जाताच मी विचार करू लागलो.एका रात्रीत स्टार सिंगर बनलेली ही सिंगर केवळ आपल्या आवाजाच्या गुणवत्तेवर आणि परमेश्वराच्या कृपेने झगमगत्या फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्री मध्ये दाखल झाली. तिच्या आवाजाची दखल आणि पूर्वायुष्यातील गरीब पार्श्र्वभूमीचा योग्य वेळी योग्य फायदा घेत टीव्ही चॅनेलने आपला टी आर पी वाढवला.’जो बिकता है वो चलता है’ ह्या एकाच तत्वाने चालणाऱ्या मनोरंजन क्षेत्रात मात्र राणू मोंडाल हिला पुढे अजुन संधी मिळतील. हाती पैसा, ऐश्वर्य आल्याने तिची कायमची गरिबी दूर झाली ही मोठी गोष्ट आहे.पण जो पर्यंत तिचं नाव आहे ,गरज आहे आणि मागणी आहे,तोपर्यंत उदो उदो करून एखाद्याला हात देऊन वर नेऊन ठेवणाऱ्या फिल्मी दुनियेत उद्या दुसरी कुणी अशीच गायिका पुढं आली तर राणूला वर नेऊन ठेवणारे कधी आपला हात काढून घेऊन तिला जमिनीवर आणतील याचा भरोसा नाही.नैराश्य आल्यावर अशा गायकांनी पुढं करायचं काय? बरं इथल्या झगमगत्या इंडस्ट्री मध्ये ठामपणे टिकण्यासाठी तेवढा ’हुशारपणा,व्यवहार ज्ञान आणि इथलं राजकारण,राणू मोंडाल सारख्या भोळ्या स्वभावाच्या गायिकेला जमेलच असं नाही.देव न करो आणि तिच्यावर कधी अशी वेळ येवो. तिला मिळालेलं यश, संपत्ती सदैव टिकून राहू देत.