Palshichi PT Marathi Movie

0
1078

” पळशीची पीटी ” या निर्माते – दिग्दर्शक धोंडिबा बाळू कारंडे यांच्या चित्रपटाची कथा ही खूपच प्रेरणादायी आहे. एकविसाव्या शतकात महिला अवकाशात भरारी घेत असताना खेड्यापाड्यातील जुनाट विचारसरणी मात्र आजही आहेत. अशिक्षित, गरीब कुटुंबात जन्मास येऊन देखील भागी ( किरण ढाणे )हिची जिद्द, मेहनत, धाङसीपणा या गुणांच्या जोरावर सक्षम असलेल्या भागीची तिच्या स्वप्नपूर्तीसाठी तिने घेतलेली गरूङझेप आपणांस पाहायला मिळते. समाजातील स्त्री वर्गाचा अभिमान वाटावा, अशीच या चित्रपटाची कथा आहे. तरी हा चित्रपट 23 ऑगस्ट 2019 ला सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल.

या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा भागी ( किरण ढाणे ) ही एका छोट्या खेड्यातील दूरवर ङोंगराळ भागात आपल्या कुटुंबासह राहत असते. घरची परिस्थिती हलाखीची असूनही तिची आपल्या स्वप्नांप्रती असलेली चिकाटी, मेहनत, ईमानदारी यांमध्ये मात्र सत्यता असते. भागीला धावण्याची खूपच हौस असते. तिला शाळेत शिक्षकांकडून शिक्षा म्हणून खेळाच्या मैदानाला राऊंड मारायला भरपूर आवडते. इतरांच्या पोटात मात्र अशा शिक्षेमुळे गोळा येतो. परंतु भागीसाठी ही शिक्षा म्हणजे जणू तिला मिळालेली सुवर्णसंधीच वाटते.

भागीच्या यशप्राप्तीचा प्रवास तिच्या शाळेपासून सुरू होतो. शाळेत तालुका स्तरावरील धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याची तिला संधी मिळते. आपल्याला मिळालेल्या या संधीचं सोनं करत भागी तालुकास्तरीय आणि राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम नंबर पटकावत संपूर्ण राज्याचा इतिहास बदलवून टाकते. भागीच्या या प्रवासामध्ये शाळेतील तिचे चित्रकला या विषयाचे बिडकर सर ( राहुल बेलापूरकर ) हे तिची स्पर्धेची संपूर्ण तयारी माळरानात घेतात. भागीच्या मेहनतीला योग्य सफलता प्राप्त व्हावी, यासाठी बिडकर सर तिला प्रत्येक प्रकारे मदत करतात. चित्रपटात विकास शिंगाडे ( राहुल मगदुत )या पोलीस हवालदाराला भागी खूप आवडते. यातूनच भागीचं विकास सोबत लग्न ठरते. आपल्या यशाच्या दिशेने उधाण झेप घेणाऱ्या भागीला घरापासून ते समाजापर्यंत बरेचदा विरोध पत्करावा लागतो. भागी आपल्या आईला स्पष्टपणे सांगते की, ” हे असं मेंढरागत जगणं मला मान्य नाही.” कारण तिला स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा असतो. आमच्या समाजात आजही कनिष्ठ जातीतील लोकांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांच्याप्रती असलेले त्यांचे हक्क यांपासून त्यांना वंचित ठेवले जाते.

” पळशीची पीटी ” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागीला आपल्या यशापर्यंत पोहचता येईल का ? समाजकंटकांच्या विरोधाला भागी तोंड देऊ शकेल का ? भागीचं पुढं काय होणार. तीचं स्वप्न सत्यात उतरेल का ? भागीसारख्या निश्चयी, धाडसी आणि कर्तृत्ववान मूलीच आपल्या मायभूमीचे नाव रोशन करू शकतात. यासाठी हा चित्रपट संपूर्ण स्त्री वर्गासाठी परिपूर्ण आहे. चित्रपटातील भागीचं धैर्यशील व्यक्तीमत्व हे वाखाणण्याजोगं आहे. त्याचप्रमाणे समाजाचा विचार न करता आपल्या विद्यार्थीनी साठी खरेपणाने झटणाऱ्या बीङकर सरांची भूमिका ही अतिशय उत्कृष्ट आहे. संगीतकार विनीत देशपांडे आणि निमीष जोशी यांचे संगीत अप्रतिम आहे. समाजातील कनिष्ठ मानल्या जाणाऱ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी तसेच उच्च – नीच भेदभाव टाळण्यासाठी अशा संकल्पनांची चित्रपटांमधून जाणीव होणे गरजेचे आहे. यासाठी महिला सक्षमीकरणासाठी तसेच समान हक्क प्राप्तीसाठी असलेली ही धडपड पाहण्यासाठी हा चित्रपट आवर्जून पाहावा.

3.5

प्रियंका पवार.