“Baba” Marathi Movie Review

0
1097
‘ बाबा ‘ या शब्दांतच संपूर्ण जग सामावलेले आहे. बाप, वडील, पिता, ङॅङ अशा अनेक शब्दांत याला संबोधले जाते. परंतु ‘बाबा ‘ हा मात्र बाबाच असतो. त्याच्या सारखा दुसरा कुणीही नसतो. दिग्दर्शक राज आर गुप्ता यांनी ‘बाबा’ या मराठी चित्रपटातून मूक – बधिर वडिलांच्या आपल्या मुलाप्रती असलेल्या भावना मांडल्या आहेत. एका छोट्या गावातील आपल्याच विश्वात राहणाऱ्या साध्या – भोळ्या कुटुंबाची ही कथा आहे. एक हसतं – खेळतं हे कुटुंब स्वतःच्या विश्वात रमणीय आयुष्य जगत असतात. कठीण परिस्थितीतूनच मार्ग काढत अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग शोधत असते. आपल्या स्वतःचा ठाम विश्वास हा अतूट असला की सारं जग आपल्या समोर कमी पडतं. या सर्व गोष्टींचे भावनात्मक वर्णन या चित्रपटातून करण्यात आले आहे. ‘बाबा ‘ हा चित्रपट 2 ऑगस्ट 2019 रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
एक लहान गोंडस कुटुंब, अगदीच दृष्ट लागण्यासारखं सुंदर, सुख-समृद्धी संपूर्ण असे असते. माधव (दिपक दोब्रियाल) आनंदी ( नंदिता धुरी )आणि त्यांचा चिमुकला शंकर ( आर्यन मेघजी ) असे या तिघांचे उंच टेकडीवर छोटसं विश्व असतं. माधव आणि आनंदी हे जन्मतःच मूक – बधिर असतात. परंतु ते आपला मुलगा शंकर याची तळहाताच्या खोङाप्रमाणे काळजी घेतात. भावनात्मक संवादातून ते त्याला नेहमीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. आनंदी तर आपल्या गोंडस बाळाला कुणाचीही नजर लागू नये, यासाठी बाहेरच्या विश्वापासून दूरच ठेवते. त्र्यंबक ( चित्तरंजन गिरी ) हा माधवचा मित्र असतो. त्याला माधव – आनंदी यांची शंकरशी असलेली जवळीक खूप चांगल्या प्रकारे माहित असते. परंतु एके दिवशी माधवच्या घरी शहरातून राजन ( अभिजित खांडेकर ) पल्लवी ( स्पृहा जोशी ) हे पोलिसांना घेऊन येतात. पल्लवीच्या म्हणण्यानुसार शंकर हा तिचा मुलगा आहे आणि कोणत्याही परिस्थितीत तिला आपल्या शंकर ( रोहन ) ला मिळवायचे असते. परंतु घरी अचानक आलेले पोलीस आणि त्यांच्यासोबतचे राजन आणि पल्लवी यांना पाहून माधव व आनंदी अगदी भांबावून जातात. आपला मित्र त्र्यंबक सोबत व्यवस्थित विचारपूस केल्यानंतर माधवला समजते की, शंकर हा आपला मुलगा नसून तो पल्लवीचा मुलगा आहे. पल्लवी ( स्पृहा जोशी ) हिच्या लग्नाआधीच्या संबंधातून जन्मास आलेला शंकर हा तीन दिवसांचा असतानाच पल्लवीला तिचे बाबा त्या बाळापासून दूर ठेवतात. तेव्हा एका ‘आया’ कडून शंकरला माधव व आनंदीकङे सोपवले जाते. परंतु पल्लवीला 8 वर्षांनंतर आपल्या शंकरची कस्टङी हवी असते. त्यासाठी ही केस कोर्टापर्यंत जाते.पल्लवी – राजन यांच्याकडून स्प्रे वकील शैलेश दातार तर माधव – आनंदी यांच्याकडून मडके वकील (जयंत गाडेकर) हे केस लढवतात.
भावनात्मक घडामोडींचा हा नातेसंबंध अखेरीस कोर्टात जाऊन पोहचला. परंतु कोर्टात निर्णय नक्की काय होणार ? पल्लवी जी शंकरची जन्मदाती आई असते. तिला त्याची कस्टडी भेटणार का? माधव – आनंदी यांनी प्राणांपलीकङे जीव लावून लहानाचं मोठं केलेल्या, स्वतःचं आयुष्य असलेल्या शंकरला त्यांना विसरावं लागणार का? शंकरला गावाकडील एकांतातील आयुष्य विसरू शहरी जीवन अनुभवायला मिळणार का? कोर्ट भावनात्मक बाजूने निर्णय देणार का? शंकरच्या उज्ज्वल भविष्याचा विचार केला जाणार का? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.
‘बाबा ‘ या चित्रपटाची संकल्पना उत्कृष्ट आहे. भावनेला भाषा ही नसतेच. मनापासून समजून घेतलेल्या भावनांच्या आधारे प्रत्येक व्यक्ती आपले आयुष्य सुंदर जगू शकते. सुखी – आनंदी जीवन जगण्यासाठी समंजसपणा, प्रेमळपणा, सच्चाई, ईमानदारी या गोष्टींची आवश्यकता असते. पैसा हेच सर्वस्व नसते. भावना या पैशापेक्षा बहुमूल्य असतात. चित्रपटातील ‘अङगुलं मङगुलं , आणि ‘बाबा ‘ हे रोहन – रोहन यांचे अप्रतिम संगीत मनाला भावणारे आहे.
दिग्दर्शक यांच्या मते, माधव ( दिपक दोब्रियाल ) यांचा शबदहीन असा अभिनय हा खूपच अतुलनीय आहे. तसेच भावना व्यक्त करण्यासाठी शब्द असणे गरजेचे नसते, त्यासाठी मनाशी घट्ट जवळीक असणे देखील महत्त्वपूर्ण असते. तसेच निर्माते संजय दत्त आणि मान्यता दत्त यांच्या निदर्शनासह या चित्रपटाची संकल्पना निर्मिती अत्यंत उल्लेखनीय आहे. ‘बाबा ‘ या शब्दांत लपलेलं भावनिक रहस्य जाणून घ्यायचं असेल तर हा चित्रपट आवर्जून पाहावा.
4/5
:- प्रियांका पवार.