माधुरी दिक्षीतने केली सुमेध मदगलकरच्या अभिनयाची प्रशंसा
आपल्या चॉकलेटी लुक्सने सध्या लाखों तरूणींची धडकन बनलेला हँडसम हंक सुमेध मुदगलकर आता बॉलीवुडची ‘धकधक’गर्ल माधुरी दिक्षीतच्या ‘बकेट लिस्ट’ ह्या सिनेमात दिसणार आहे. ‘व्हेंटिलेटर’ आणि‘मांजा’ चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेल्या सुमेधसाठी ही त्याच्या करीयरची एक महत्वपूर्ण फिल्म असेल. माधुरीने ट्विटरवरून सुमेधची जी नुकतीच प्रशंसा केली आहे, त्यावरून तर तसेच समोर येतेय.
माधुरी दीक्षित सुमेधविषयी म्हणते, “ बकेटलिस्ट चित्रपटातला तुझा परफॉर्मन्स नक्कीच प्रेक्षकांना भावेल. आणि त्याने तू कित्ती उत्तम अभिनेता आहेस, हे लोकांसमोर सिध्द होईल, ह्याचा मला विश्वास वाटतो. तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.”
खुद्द माधुरी दिक्षीतकडून एवढी वाहवाही मिळाल्यावर सुमेध खूप खूश झाला आहे. तो म्हणतो, “माधुरी मॅमकडून अशी शाबासकी व्हावी, हे माझ्यासारख्या कोणत्याही नव्या अभिनेत्याचं भाग्यच म्हणावे लागेल. त्यांची जेवढी कारकिर्द आहे, तेवढं माझं वयही नाही आहे. पण त्यांनी सोशल मीडियावर येऊन अशी जाहिरपणे माझी स्तुती करावी, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”